हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणार्या संत शेख महंमद महाराजांचा जन्म वाहिरा (ता.आष्टी, जि.बीड) येथे झाला. गुरु चांदबोधले यांचेकडून त्यांनी अनुग्रह घेतला होती. संत शेखमहंमद महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे गुरु होते. संत शेख महंमद महाराजांनी संत तुकाराम महाराजांना पहिल्यांदा कीर्तनास उभे केले. ‘जिंदा पीर’म्हणविणार्या औरंगजेबाने आष्टी तालुक्यातील वाहिरा या जन्मगावी 400 एकर जमीन इनाम दिली होती. संत परंपरेतील दीर्घायुष्य लाभलेले संत म्हणून शेख महंमद महाराज यांचा उल्लेख होतो. "ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा" अशी म्हण प्रचलित आहे. एकूणच कबिरांच्या विचारधारेचा त्यांनी स्वीकार केला होता. 26 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या संस्कृतिक कार्यक्रमात "संत परंपरा, भक्ती शक्ती" दर्शन घडविणारा चित्र रथ साकारण्यात आला त्यामध्ये संत शेख महंमद महाराजांची मुर्ती बसवण्यात आली होती. संत शेख महमंद महाराजांनी योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक - प्रबोध, ज्ञान गंगा, साठी संवत्सर, भक्तिबोध, आचारबोध, भारुडं, दक्खिनी रचना, पारिभाषिक कोश, दुचेश्मा व अभंग अशी साहित्य संपदा निर्माण केली होती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणार्या संत शेख महंमद महाराजांनी आपल्या साहित्यात मानवी जीवन मूल्यांची जोपासना केली आहे. अंधश्रध्दा, कर्मकांड, चुकीच्या प्रथा परंपरा यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अनमोल मानवदेहाचे सार्थक करण्याचा कल्यानाचा मार्ग त्यांनी साहित्यात सांगितला आहे. त्यांच्या याच विचाराने प्रेरीत होऊन त्यांच्या विचारांची परंपरा पुढे चालविण्याच्या उद्देशाने श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.