News Details

  • Home
  • निष्कलंक प्रबोध

निष्कलंक प्रबोध


संत शेख महंमदांचा ‘निष्कलंक’


वारकरी संप्रदायातील राजश्रयीत संत म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे संत शिरोमणी शेख महंमद महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचे गुरु. ज्यांनी संत तुकाराम महाराजांना कीर्तन करण्यास उभे केले, असे अधिकारी पुरुष.


‘जिंदा पिर’  म्हणविणार्‍या अलमगीरला विद्वत्तेच्या जोरावर शिर झुकवायला लावणारे संत, दिव्य ज्ञानासमोर सत्ताही हतबल होते, तेव्हा खर्‍या ज्ञानाचा विजय होतो. या न्यायाने अलमगीरने महाराजांना त्यांच्या गावी आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे जमीन इनाम म्हणून दिली. संत परंपरेतील दिर्घायुष्य लाभलेले संत म्हणून शेख महंमद महाराज यांचा उल्लेख होतो. नुकताच चारशे वर्षानंतर प्रथम प्रकाशित केलेला ग्रंथ निष्कलंक प्रबोध निमित्ताने...
‘ निष्कलंक’ या ग्रंथाचा नामोल्लेख त्यांनी सहाव्या अध्याय मध्ये केला आहे.  निष्कलंक प्रबोध । या ग्रंथाचे नाम । नासे भव भ्रम । ऐकता याशी ॥38॥अ.6॥ या ग्रंथाला ऐकल्यानंतर भवसागरातून मुक्त व्हाल. निष्कलंक प्रबोध या ग्रंथाचे नाव असल्याने महाराजांनी वेळोवेळी ‘निष्कलंक’ आणि ‘प्रबोध’ हे शब्द प्रयोग केलेला आहे. निष्कलंक रत्नाकर । स्वहिताचे भांडार । कथी ज्ञानधीर । शेख महंमद ॥32॥अ.1॥ मी


निष्कलंक याग्रंथामध्ये त्यांनी कर्मकांड करणार्‍या पुराणीक, तथाकथीत बुवाबाजीवर प्रहार केलेला आहेे. सनातनी पुरोहितांचा उल्लेख करतांना भट व ब्राह्मण असा टोकाचा उल्लेख करतात. याकामी त्यांनी कोणताही मुलाहीजा ठेवला नाही. माणसाने जीवन जगताना आचार, विचारशील जीवन शैली अंगीकारली पाहिजे हे निक्षून सांगीतले आहे. ज्ञानविवेक याची महत्ता, तथाकथीत ब्राह्मण्यावर टीका व खरा ब्राह्मण कोण याची व्याख्या केली आहे. नरजन्माचे सार्थक करण्याचा सोपा उपाय सांगितला आहे. फटकळ, परखड शब्दांत लिखान केले असले तरी जनहिताचा कळवळा, त्यांच्या प्रतिची आत्मियता यातून दिसून येतो. संत शेख महंमद महाराजांनी सर्वसामान्यांना निष्कलंक करण्यासाठीचा हा शब्द प्रपंच केलेला आहे, तोच हा ‘निष्कलंक प्रबोध’होय.. अजापुत्र बैल हाले । सखे बंधु विश्वाचे । योगीराज त्याचे । वंशवर्ग ॥94॥ शहाण्णव कुळे याती । पशुची जोड खाती । बांधोन कापती । गळे त्यांचे ॥95॥ बोकड, बैल, टोणगा हे सर्व विश्वाचे बंधू आहेत आणि आपण त्यांचे वेशज आहोत. परंतु माणूस एवढा क्रुर झाला की आपल्याच बांधवांचे गळे कापून खाऊ लागला. ही बाब अतिषय निंदणीय आहे, पशुहत्येच्या विरोधात संत शेख महंमद महारांनी किती टोकाचा संघर्ष केला या ओवीवरुन लक्षात येत आहे.  एखादा कपड्याच्या दुकानातील चित्रातील स्त्री पाहूणनही माणूस मोहीत होते. अशा लोकांना काय म्हणावे असा प्रश्न निर्माण झाला.  चित्रीची राणी । न पडावी नयनी । हे बोली वचनी । निष्कलंक ॥47॥ अ.2 या अशा अनेक विषयांचा उल्लेख शेख महंमद महाराजांनी केलेला आहे.


साधु आणि संतांचे  महत्व दुर्जनाला काय समजेल हा महिमा साधूलाच माहिती आहे. साधुची महिमा । साधुलाची साहे । निवाडे सोसी घाय। हिरा घणाचे ॥88॥ संगती कोणाशी करावी याविषयी महाराज म्हणतात,  तोंडी ब्रह्मज्ञान । हृदयाचे घाण । त्यासी सन्नीधान । करु नये ॥47॥ ब्रह्मज्ञानी जरी असला पण आचरण शुन्य असेल तर त्याच्याशी संगत करु नये. काही लोक स्वार्थासाठी खुप गोड बोलतात पण वेळ प्रसंगी जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा स्वार्थी लोकांशी संगत टाळावी.


या इहलोकामध्ये मानव जन्म मिळाला म्हणून भक्ती भावाने, मनोभावे संतांना शरण जावे. विंचवाच्या जन्माला आला आणि संतांना शरण गेला तर मरण पत्कारल्याशिवाय पर्याय नाही. सर्पाच्या योनीला जाऊन संतांना शरण जाण्यासाठी निघाला तर दंश करील या भितीने लोक तोंड ठेचून मारुन टाकतील.


बाळकालागून । माता देई पान्हा । तेवी संता करुना । विश्वजनाची ॥98॥ ज्या प्रमाणे आई आपल्या बाळाला दुध पाजून शांत करते तद्वत संत समाजाला ज्ञान देवून सज्ञान करतात. समाज शहाणा करण्यासाठी, परिवर्त करण्यासाठीत त्यांचा अट्टहास असतो. दैनंदिन जीवन जगत असतांना माणसाने कशा प्रकारे जीवन जगावे याचे यथोची ज्ञान निष्कलंक या ग्रंथामध्ये संत शेख महंमद महाराज यांनी केले आहे. संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण निष्कलंक प्रबोध ग्रंथ अभ्यासून आपल्या जीवना उध्दार कराल अशी अपेक्षा... जय हरी ... !


                                                      ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज
                                       अध्यक्ष, संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान,
                                                      श्रीक्षेत्र वाहिरा, ता.आष्टी, जि.बीड.