News Details

  • Home
  • माझा वाहिरा गाव स्वर्गापेक्षा भारी

माझा वाहिरा गाव स्वर्गापेक्षा भारी

माझा वाहिरा गाव स्वर्गापेक्षा भारी
 

             दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या मी गावाकडे आलो. बदली झाल्यापासून गावाचा आणि माझा बराचसा संपर्क कमी झाला होता. शाळा, प्रवचन, दिंडी,कार्यक्रम,श्रमदान,वाचन ,लेखन यात मी स्वतःला गुंतवून घेतले. यामुळे गावात येणे जाणेही कमी झाले. यावेळी मात्र मनसोक्त गावात सुट्टीचा आनंद घेतला.गावात दररोज संत शेख महंमद महाराज आरती सुरु असते. दररोज आरतीला जाऊ लागलो. शेख महंमद महाराजांची आरती सुरू झाल्यापासून गावात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.  सकाळी सकाळी …आरती शेख महंमदाची…ओवाळा सज्जन संताची// .. ही आरती साऱ्या गावाला जागे करते. आरतीचे बोल कानी पडताच अंग शहारून येते. भक्तीभाव जागृत होतो. अनेक भाविक भक्त सकाळी आरतीला महाप्रसादाला हजर असतात.  निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे वाहिरा गाव. तिन्ही बाजूंनी डोंगर आहे. गावात गायरानात हजारो झाडे लावली आहेत. गावातील प्रत्येकाच्या दारापुढे झाडे आहेत. दूरवरून पाहिले की गावातील घरे न दिसता फक्त झाडेच दिसतात. एवढी दाट झाडे आहेत. संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरातील जांभूळ वन , मुलांना खेळण्यासाठी खेळण्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा झाडे लावलेले आहेत. शांतता, भक्ती, समतेचा संदेश देणारा श्वेतध्वज डौलाने फडकत आहे. विठ्ठल मंदिर परिसर अतिशय सुशोभित झाला आहे. गावातील सर्व मंदिर अतिशय प्रशस्त आहेत. गावातील शाळेचा लोकसहभागाने कायापालट झाला आहे. गावची शाळा म्हणजे प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी आहे . प्रशस्त वर्ग खोल्या, भव्य क्रीडांगण, मैदानाभोवताली झाडे आहेत.  अशा या वातावरणात अगदी प्रसन्न वाटते. काय ती झाडी!.. काय ते डोंगर!… काय ते मंदिरं!…काय ती शाळा !… एकदम झकास! …स्वर्गापेक्षा भारीच!..  वाहिरा नगरी …


                       निवडणुका सुरू असल्याने गावात राजकारणाच्या गप्पा रंगल्या आहेत. चाय पे चर्चा सुरू आहे. गावातील राजकारण प्रेमी गप्पात दंग आहेत.  अधून मधून येता जाता मित्रपरिवार भेटला की विचारतो सर कुणाची हवा आहे. शिक्षक असल्याने हाताची घडी तोंडावर बोट आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे.  एवढेच सांगतो की ज्याचे कर्म चांगले. ज्याने जसे पेरले तसे उगवणार आहे. मित्रमंडळी काय ते समजून घेतात. वेळ मिळेल तेव्हा ओळखीतील कोणाच्या तरी घरी जातो.( तसे सगळेच ओळखीचे).  मग वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात. शेती पिके याविषयी चर्चा होते. मुलांच्या शिक्षणावर चर्चा होते.एकमेकांच्या अडीअडचणी समजून येतात. सुसंवादाने एकमेकांना आधार भेटतो. तो आधार ते प्रेमाचे शब्द  मनाला स्पर्श करतात. मन प्रफुल्लित होते. गावात अजूनही गावपण टिकून आहे. माणुसकी मानवता जिवंत आहे.  जे भेटतील त्यांच्याशी बोलत राहिलो. आनंद घेत राहिलो.  ऐकून घेण्यातही मजा असते . ती मजा अनुभवली. कधी मधी चौकात दारू पिऊन आलेला एखादा भेटायचा. तोही जवळ यायचा. विचारपूस करत होतो.  किती दिवस पिणार दारू? .. सोडून दे लवकर..  तोही म्हणायचा मला पण इच्छा आहे सोडायची .. लवकर सोडतो. प्रेमाने सांगितले की प्रेमाने बोलत होती.. ऐकून घेऊन विचार करत होती. मला मनापासून वाटायचं गाव व्यसनमुक्त व्हाव. यासाठी व्यसनमुक्त चळवळ राबवली होती परंतु त्यात सातत्य राहिले नाही. पुन्हा काही त्या मार्गाला गेली. यांना समजून सांगितलं, समजून घेतलं तर नक्की बदल होईल.


                     गावाचं वैभव गावाची माणसं आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्माची माणसं गुण्यागोविंदाने नांदत आहेत.  सगळीकडे जातीवादाचे धर्मवादाचे विष उगवलेले असताना इथे मात्र अमृताचा झरा आहे. ही ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभलेली ही भूमी अतिशय पवित्र पावन आहे. हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करणारे महान विभूती, योगसंग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध ,अभंग लिहिणारे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांची ही जन्मभूमी आहे. संत विचार मनामनात रुजलेले आहेत.भक्ती, समता ,शांतता, संयम, प्रेम, बंधुभाव ,एकात्मता सर्वाठायी आहे.  चांगल्या कार्यासाठी गाव उभे राहते. सुख दुःखात एकमेकांच्या मदतीला धावून येतात. गावातील अनेक हिरे (मुलं )पुणे, मुंबई,  वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग ,व्यवसाय, नोकरीत आपला ठसा उमटवत आहेत. गावाचे नाव उंचावत आहेत. सणावाराला गावच्या लेकी ( लेक शेख महंमदाची) गाव गजबजून जाते. संत शेख महंमद महाराज यांचा भंडारा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक भक्त दर्शन घेऊन धन्य धन्य होतात. भैरवनाथ यात्रा, पद्मावती जत्रा, शिवाई देवी यात्रा, लक्ष्मीआई जत्रा साजरी केली जाते. गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गावातून पंढरपूर, आळंदी, पैठण याठिकाणी दिंडी सोहळे जातात. वारकरी मोठ्या उत्साहात आनंदात सहभाग घेतात.  गावातील वाघे मंडळी , शेडा वाजविणारे, आराधी मंडळ , भजनी मंडळे सांस्कृतिक परंपरा जपत आहेत .असे ही वाहिरा गाव म्हणजे माझी स्वर्ग भूमी आहे. 
  या  दिवाळीच्या सुट्ट्यात या स्वर्गभूमीत आनंदाने दिवाळी साजरी केली. मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. अशी माझी ही मातृभूमी …

           

           गाव माझे वाहिरा 
            आहे माझा स्वर्ग
             पवित्र पावन भूमी
              बहरलेला निसर्ग ….

              या भूमीत जन्मलो
              मी खूप पुण्यवंत
              विचारांची नगरी
              जन्मले इथे संत …

 

              शब्दांकन
       ह.भ.प.किसन आटोळे सर 
       लेखक कवी प्रवचनकार