पिंपळगाव येथील संत शेख महंमद महाराज मंदिर पाहून आले मन भरून ...
आज कड्यावरून पिंपळगाव मार्गे वाहिरा गावाकडे निघालो . पिंपळगाव येथे आल्यानंतर एक सुंदर मंदिर दिसले. माझा बंधू बाळूला म्हटले गाडी थांबव. त्याने गाडी थांबवली व मी मंदिराकडे निघालो. मंदिर परिसरात जाताच अतिशय प्रसन्न वाटले. मंदिरात प्रवेश करताच माझे आराध्य दैवत श्रध्दास्थान असलेले संत शेख महंमद महाराज यांची सुंदर मूर्ती दिसली. आणि मूर्ती तेथील समाधी पाहून मन भरून आले. मूर्ती पाहताच चैतन्य लहरी माझ्या शरीरात प्रवेश करून माझे मन प्रसन्न झाले. माझ्या डोळ्यासमोर शेख महंमद महाराज यांचे कार्य विचार दिसू लागले. एवढी मोठी महान विभुतीच्या गावी माझा जन्म झाला त्याबद्दल अभिमान वाटला. याच भूमीत संत शेख महंमद महाराज यांचे कार्य विचार प्रचार प्रसार करताना संघर्ष करावा लागला याची पण जाणीव झाली. आजही तो सुप्त संघर्ष सुरू आहे. ज्या संताने जाती धर्माच्या भिंती ढासळून दिल्या व मानवता धर्म शिकवला. त्याच वाहिरा भूमीत काही धर्म वेडे संत शेख महंमद महाराज यांना ते मुस्लिम , पिर आहेत हे सांगत आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. संत हे जाती-धर्माच्या पलीकडचे असतात. परंतु या काही अज्ञानी धर्मवेड्यांना कोण सांगणार ? हिंदू धर्मातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती संत शेख महंमद महाराज यांचे नाव घेतले जाते. पण याच भूमीत या विचारांचा विसर पडला की काय ? या संतांनी योगसंग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध ,अभंगवाणी असे साहित्य ग्रंथ लिहून समाजाला भगवंताचा पंथ सांगितला. जरी हे विचार दाबण्याचा काही वर्ष प्रयत्न झाला . आजही केला जातो पण ते विचार ते ग्रंथ उसळी मारून समाजात रुजत आहेत. त्याचेच प्रतीक म्हणजे पिंपळगाव येथील संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचे मंदिर.
वाहिरा ही संत शिरोमणी शेख महंमद महाराजांची जन्मभूमी तसे श्रीगोंदा ही कर्मभूमी आहे. परंतु शेख महंमद महाराज यांनी महाराष्ट्रभर ज्ञान, भक्ती, समता, शांतीचा प्रचार प्रसार केला. हेच विचार गावोगावी ग्रंथ , कीर्तन, प्रवचन रूपाने गावातील संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठान प्रसारित करत आहेत. यात मी सुद्धा एक खारीचा वाटा उचलत आहे. याचा मला आनंद वाटतो. आज वाहिरा परिसरात बोरोडी , पिंपळगाव येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले आहेत. तसेच रुई येथे ठाणं आहे. पनवेल येथे समाधी बांधून भक्तगण दर्शन घेत आहे. लाखो भक्तांच्या घरोघरी फोटो दर्शन घेतले जाते. ग्रंथ पारायण केले जात आहे. संत शेख महंमद महाराज हे थोर विठ्ठल भक्त होते. या थोर संतांना माझा कोटी कोटी प्रणाम.. पिंपळगाव येथील मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन सर्वांना सद्बुद्धी दे ही प्रार्थना केली आणि मी तेथून गावाकडे निघालो .... मनोमन शेख महंमद महाराजांना म्हटले हे देवा तुझी चरण सेवा नित्य घडू दे .. तुझा विसर पडू देऊ नकोस. ...
हेचि दान देगा देवा l तुझा विसर न व्हावा
ह.भ.प.किसन आटोळे सर
संत शेख महंमद महाराज चरित्रकार*